सध्या भारतासह जगातील सर्वच देश कोरोना महामारीने परेशान झाले आहेत. या विषाणू वर उपचार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची लस सध्या तरी जगातील कोणत्याही देशामध्ये तयार झालेली नाही. त्यामुळे या विषाणू चा केवळ प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगातील सर्वच देशांमधील सरकारे आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. सध्या तरी 'सोशल डिस्टनसींग' किंवा 'होम क्वारंटाईन' हे दोनच पर्याय या विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगासमोर आहेत.
जानेवारी महिन्यात कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे झालेल्या 'कोव्हिड 19' या आजाराचा पहिला रुग्ण चिन देशात आढळला. त्यावेळी कोणाला कल्पना ही नसेल हा आजार संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजवेल. त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने देखिल त्याकडे दुर्लक्ष केले. त्याची किंमत आज संपूर्ण जगाला चुकवावी लागत आहे. चिन नंतर या विषाणू ने इटली देशात थैमान घालायला सुरु केले. केवळ 6 करोड च्या जवळपास लोकसंख्येच्या या इटली देशाची आरोग्य व्यवस्था जगातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था असणाऱ्या दोन देशांपैकी एक आहे. असे असतानाही आतापर्यंत कोरोना विषाणू तब्बल दहा हजार पाचशेहून अधिक बळी या देशात गेलेत. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत देखील कोरोना विषाणू तांडव करीत आहे आतापर्यंत सुमारे एक लाख चाळीस हजारांहून अधिक लोकांना या विषाणू ची लागण झाली आहे. अमेरिकेची लोकसंख्या भारताच्या तुलनेत अतिशय विरळ आहे तरी हा विषाणू वेगाने पसरत आहे.
कोरोना विषाणू चा पहिला रुग्ण भारतात साधारण मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला, तेव्हा इटली हा देश या विषाणू च्या तिसऱ्या पातळीवर पोहोचला होता. इटली मधील हाहाकार बघुन आपल्या देशाने वेळीच सावधगिरी बाळगुन योग्य उपाययोजना करण्यास सुरुवात केली. परंतु या उपाययोजना करताना आपल्या देशातील सरकारला आपल्या लोकसंख्येचा विसर पडला असावा. आपला देशाचा लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसरा क्रमांक लागतो आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात सातवा क्रमांक आहे. या प्रमाणात खुप मोठा फरक आहे.
इटली आणि भारत या देशांत खुप मोठा फरक आहेत. आपल्या देशात संपूर्ण लोकसंख्येच्या साधारण 25 ते 30 टक्के लोकांना दिवसभर काम केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना रात्री भाकर मिळते. साधारण 15 मार्च पासुन देशातील सर्वच राज्यांनी 'लॉकडाऊन' सुरू केले होते. परंतु त्यावेळी सरकारकडून वारंवार सांगितले जात होते की सार्वजनिक वाहतूक बंद होणार नाही. त्यामुळे पोटासाठी स्थलांतर केलेल्या मजुरांनी आपल्या मुळ गावी जाण्याची घाई केली नाही. कारण, गावी जाऊन आपल्या कुटुंबाची भुक कशी भागेल याची काळजी सतावत असेल. मग 22 मार्च रोजी देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात एकदिवसीय 'जनता कर्फ्यु' चे आवाहन जनतेला केले. त्यामुळे त्या दिवशी रेल्वेसह सर्वच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी किमान रेल्वे तरी चालु होईल अशी अपेक्षा स्थलांतरित कामगारांना होती, परंतु अचानक 22 मार्च रोजी सायंकाळी रेल्वेने परिपत्रक काढून देशातील सर्व रेल्वे 31 मार्च पर्यंत रद्द असेल असे जाहीर केले. त्यानंतर लगेच 24 मार्च ला पंतप्रधानांनी आपल्या देशात 21 दिवस लॉकडाऊन घोषित केले आणि देशातील नागरिकांना तुम्ही जिथे आहात तिथेच राहा असे आवाहन केले. परंतु जेव्हा काही कामच नसेल तेव्हा ते तिथे राहुन काय करतील? काय खातील ? याचा विचार करण्याचे ते कदाचित विसरले असणार. जर मोदींनी असे अचानक 'लॉकडाऊन' करण्याऐवजी जर 1-2 दिवस वाहतूक व्यवस्था सुरू ठेऊन नंतर 'लॉकडाऊन' केले असते तर दिल्ली, मुंबई अशा विविध शहरांत दिसणारी कामगार, मजुरांची गर्दी आज आपल्याला दिसली नसती, आणि परिणामी पंतप्रधानांना माफी मागायची गरज पडली नसती. परंतु उशिरा का होईना प्रशासनाने सर्व मजुरांना, कामगारांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, आणि त्यादृष्टीने पावले देखील उचलत आहेत...
जनतेने प्रशासनाने केलेल्या सर्व उपाययोजनांचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे जेणेकरून आपल्याला कोरोना वर विजय मिळवता येईल....
✒️ नवनित कुमार तापडिया