Friday, March 15, 2024

147 वर्षांचं झालं कसोटी क्रिकेट...


Happy Birthday Test Cricket: 15 मार्च हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात खूप खास आहे. 147 वर्षांपूर्वी म्हणजेच 1877 मध्ये आजच्याच दिवशी कसोटी क्रिकेटची अधिकृत सुरुवात झाली होती. तेव्हा मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जगात पहिल्यांदाच ऐतिहासिक कसोटी सामना खेळला गेला. विशेष म्हणजे त्या कसोटी सामन्यासाठी वेळेची मर्यादा नव्हती. कितीही दिवस लागले तरी दोन्ही संघांना प्रत्येकी दोन डाव खेळायचे होते. कसोटी इतिहासातील पहिला सामना 15 ते 19 मार्च दरम्यान पार पडला. पहिल्या 3 दिवसांच्या खेळानंतर चौथा दिवस म्हणजे 18 मार्च 1877 (रविवार) हा विश्रांतीचा दिवस म्हणून ठेवण्यात आला. यानंतर पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियानं 45 धावांनी विजय मिळवला होता.

बॅनरमॅननं झळकावलं क्रिकेटच्या इतिहासातलं पहिलं शतक : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज चार्ल्स बॅनरमॅनसाठी तो ऐतिहासिक कसोटी सामना खूप खास ठरला. बॅनरमॅननं कसोटी क्रिकेटच्या पहिल्याच दिवशी शतक झळकावलं. इतकंच नाही तर पहिली कसोटी धावही बॅनरमॅनच्या बॅटमधूनच आली. कसोटी सामन्यातील पहिला चेंडू इंग्लंडच्या अल्फ्रेड शॉनं टाकला आणि तो चेंडू बॅनरमॅननं खेळला. त्यानंतर कांगारु फलंदाज चार्ल्स बॅनरमॅननं वैयक्तिक पन्नास धावांचा टप्पा गाठला. एवढंच नाही तर त्या अर्धशतकाचं शतकात रुपांतर करुन त्यानं इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्या शतकाची जेव्हा चर्चा होते तेव्हा बॅनरमॅनचे नाव अग्रस्थानी असते. अखेरीस बॅनरमॅन 165 धावा करुन निवृत्त झाला. बॅनरमॅन जखमी झाला होता. त्याच्या बोटाला दुखापत झाली होती.

बॅनरमॅन नंतर मिडविंटरचा कहर : ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 245 धावा केल्या होत्या. त्यापैकी एकट्या बॅनरमॅननं 165 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लिश संघ पहिल्या डावात केवळ 196 धावाच करु शकला. त्यांच्याकडून सलामीवीर हॅरी जपनं सर्वाधिक 63 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून बिली मिडविंटरनं पाच बळी घेतले. अशा प्रकारे पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाला 49 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. यानंतर इंग्लंडनं पलटवार करत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 104 धावांत संपुष्टात आलाय. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता. यादरम्यान इंग्लंडकडून आल्फ्रेड शॉनं पाच आणि जॉर्ज उलिएटनं तीन विकेट घेतल्या. 
 
टॉम कँडलची ऐतिहासिक कामगिरी : इंग्लंड संघाला सामना जिंकण्यासाठी 154 धावा करायच्या होत्या, मात्र ते तसं करु शकले नाही. कांगारु गोलंदाज टॉम कँडलसमोर इंग्लिश फलंदाज टिकू शकले नाहीत. त्यांचा संपूर्ण संघ 108 धावांवर कोसळला आणि त्यांना 45 धावांनी गमावावा लागला. इंग्लंडचे तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. यष्टिरक्षक जॉन सेल्बीनं सर्वाधिक 38 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियातर्फे टॉम कँडलनं सात आणि जॉन हॉजेसनं दोन गडी बाद केले.
 
आजपर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 2535 सामने खेळले गेले आहेत. यात इंग्लंडनं सर्वाधिक कसोटी सामने (1071 सामने) खेळले आहेत. तर ऑस्ट्रेलियन संघ या बाबतीत (866 सामने) दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियानं 414 तर इंग्लंडनं 392 कसोटी सामने जिंकले आहेत. सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतानं आतापर्यंत 579 सामने खेळले आहेत. यात भारतानं 178 कसोटी सामने जिंकले आहेत, तर तेवढ्याच सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय भारतीय संघाचे 222 कसोटी सामने अनिर्णित राहिले, तर एक सामना टाय झालाय.

 क्रिकेट इतिहासातील पहिल्या कसोटी सामन्याची स्थिती :ऑस्ट्रेलियन संघ- पहिला डाव: 245 धावा आणि दुसरा डाव: 104 धावा

                                  इंग्लंड संघ- पहिला डाव : 196 धावा आणि दुसरा डाव : 108 धावा  

निकाल : ऑस्ट्रेलिया 45 धावांनी विजयी

कसोटी क्रिकेटमधील काही विक्रम - 

एका डावात सर्वाधिक धावा - श्रीलंका 952/6D (271 षटकं) विरुद्ध भारत, 2 ऑगस्ट 1997, कसोटी सामना क्रमांक 1374

एका डावात सर्वात कमी धावा - न्युझीलंड 26/10 (27 षटक) विरुद्ध इंग्लंड, 25 मार्च 1955, कसोटी सामना क्रमांक 402 

डावाच्या बाबतीत सर्वात मोठा विजय - इंग्लंड एक डाव 579 धावांनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 20 ऑगस्ट 1938, कसोटी सामना क्रमांक 266

धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय - इंग्लंड 675 धावांनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया (लक्ष्य 742) 30 Nov 1928, कसोटी सामना क्रमांक 176

धावांच्या बाबतीत सर्वात लहान विजय -  1) वेस्ट इंडिज 1 धावेने, विरुद्ध ऑस्ट्रेलिया 23 जानेवारी 1993, कसोटी सामना क्रमांक 1210                                                                         2) न्युझीलंड 1 धावेने, विरुद्ध इंग्लंड, 24 फेब्रुवारी 2023, कसोटी सामना क्रमांक 2494


सर्वाधिक वेळ चाललेला सामना - दक्षिण आफ्रीका विरुद्ध इंग्लंड 10 दिवस चालला, सामना अनिर्णीत राहिला, सामना सुरुवात 3 मार्च 1939 रोजी झाला. कसोटी सामना क्रमांक 271

कोणत्या मैदानावर सर्वाधिक सामने - लॉर्ड्स, लंडन 1884-2023 दरम्यान 145 सामने

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा -  सचिन तेंडूलकर (भारत) 15921 धावा, 200 सामने 329 डाव, 51 शतकं, 68 अर्धशतकं, 248* सर्वोच्च धावा 

एका डावात सर्वाधिक धावा -  ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) 400* धावा 582 चेंडू, 43 चौकार, 4 षटकार विरुद्ध इंग्लंड, 10 एप्रिल 2004 

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं -  सचिन तेंडूलकर (भारत) 51 शतकं

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतकं -  सर डॉन ब्रॅडमॅन (ऑस्ट्रेलिया) 12 द्विशतकं, 52 सामने 

पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा - गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज) 365* धावा विरुद्ध पाकिस्तान 26 फेब्रुवारी 1958 
सर्वात वेगवान शतक - ब्रेंडन मॅक्युलम (न्युझीलंड) 54 चेंडूत शतक विरुद्ध ऑस्ट्रेलिया 
सर्वाधिक बळी - मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) 800 बळी, 133 सामने, 230 डाव 
एका डावात सर्वाधिक बळी - 1) जे लेकर 10 बळी, विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 26 जुलै 1956 

                                         2) अनिल कुंबळे (भारत) 10 बळी, विरुद्ध पाकिस्तान, 4 फेब्रुवारी 1999

                                         3) एजाज पटेल (न्यूझीलंड ) 10 बळी विरुद्ध भारत 3 डिसेंबर 2021 

एका सामन्यात सर्वाधिक बळी :  1)जे लेकर 19, विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 26 जुलै 1956

                     2) सर्वाधिक 5 विकेट हॉल्ट - मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) 67 वेळा 

सर्वाधिक 10 विकेट हॉल्ट -  मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) 22 वेळा









No comments:

Post a Comment

147 वर्षांचं झालं कसोटी क्रिकेट...

Happy Birthday Test Cricket: 15 मार्च हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात खूप खास आहे. 147 वर्षांपूर्वी म्हणजेच 1877 मध्ये आजच्याच दिवशी कसोटी क्र...